आज 1 नोव्हेंबरला मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेचा एल्गार काढणार सत्याचा मोर्चा सुरु झाला असून या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात तसेच अनेक कार्यकर्ते देखील सहभागी झाले आहेत. यावेळी या मोर्चावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली पाहिजे, भाषणामध्ये खोटे आरोप करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे, लोकसभेमध्ये जो खोटारडेपणा केला तोच प्रयत्न केला जात आहे. लोकसभेत काँग्रेसचे 31 खासदार ज्या मतदार यादीवर निवडून आले, तीच ही मतदार यादी आहे. निवडून आलेल्या 31 खासदारांनी मग मत चोरी केली होती का? ते आज त्यांनी मोर्चामध्ये स्पष्ट केले पाहिजे. लोकसभेत विजय झाला तर यादी चांगली होती, विधानसभेत पराभव झाला तर मतदार यादी खराब झाली, आता महाविकास आघाडीचा चांदा ते बांदा पुन्हा एकदा पराभव होणार आहे, त्यामुळे पराभवासाठी लागणारे कारण उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी शोधत आहे.
दुबार, तिबार मतदानावर यापूर्वी भाजपनेही आक्षेप नोंदवला आहे. मतदारयाद्या अद्यायावत झाल्या पाहिजे. पण त्यासाठी आज जो मुंबईत मोर्चा काढण्यात आला, तो खोटारड्या लोकांचा आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यावर याद्या बरोबर होत्या. मात्र विधानसभेत पराभव झाल्यावर त्याच याद्या बोगस आहेत म्हणून ओरडायचे, हे बरोबर नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणाऱ्या संभाव्य पराभवाचे कारण तयार ठेवण्यासाठी खोटारड्या लोकांनी केलेली ही सोय आहे. अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.