बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुशपणे हत्या करण्यात आली, या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण प्रचंड तापल्याचं पाहायला मिळालं. संतोष देशमुख यांची हत्याप्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांचे सर्वात जवळचे कार्यकर्ते वाल्मिक कराड हे सध्या कोठडीत आहेत. पहिल्या दिवसापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्यावर जोर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असताना आता आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे. आजारी असल्याने धनंजय मुंडेंच्या भेटीला गेल्याचं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं आहे.
त्याचसोबत ही भेट त्यांच्या निवासस्थानी झाली असून ती विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं देखील सुरेश धस म्हणाले आहेत. भेट घेणे ही वेगळी गोष्ट आणि लढा वेगळा आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तो पर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये समेट झालाय का? याची चर्चा देखील सुरु झाली आहे. तसेच आता यावर चंदशेखर बावकुळे यांनी एक मोठा खुलासा केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी सुरेश धस आणि धनंजय मुंडे आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो. मी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट घडून आणली आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस दोघेही भावनिक आहेत, काही काळाने दोघांचे मतभेद दूर होतील. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची पारिवारिक भेट झाली आहे. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केलं आहे. आम्ही तिघे ही परिवार म्हणून बसलो होतो. त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
आमदार सुरेश धस काय म्हणाले?
आमदार सुरेश धस म्हणाले, माझी आणि धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थान भेट झाली. धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या तब्बेतेची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो. कोणाच्या तब्बेतेची चौकशी करणे यामध्ये काही गैर नाही. या विषयात गजब करण्यासारखे काहीच नाही. आमचा लढा सुरुच राहणार आहे. मी त्यांचा राजीनामा मागितला नाही, त्यांच्या पक्षाचे लोकच त्यांचा राजीनामा मागे मागत आहेत. त्यांचा राजीनामा घेणे, न घेणे हे अजित पवार यांच्या हातात आहे. पुढील काही दिवसांमध्ये आणखी काही गोष्टी समोर येणार आहेत त्यावेळी मी सगळ काही सांगणार आहे. असं सुरेश धस म्हणाले आहेत.