आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही : छगन भुजबळ
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करून त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला. मात्र या जीआरवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. “ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, त्याला आमचं दुमत असण्याचं कारण नाही,” असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या भूमिकेला छगन भुजबळांनी कडाडून विरोध केला आहे.
भुजबळ म्हणाले, “आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. मराठा हा समाज, एक जात आहे. पण ओबीसी हा वर्ग आहे, ज्यात अनेक जातींचा समावेश आहे. ओबीसी सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत. त्यामुळे केवळ आर्थिक परिस्थितीवर आरक्षण देण्याला आम्ही विरोध करतो.” भुजबळांनी थेट अजित पवारांच्या वक्तव्याला छेद दिला आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर आपली ठाम भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार यांनी आपल्या वक्तव्यात जात-पात आणि नात्यांचा विचार न करण्याची भूमिका मांडली होती. “मी फक्त माणूस पाहतो आणि मदत करतो. काही लोक जातीचे वेड डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात, समाजात तेढ निर्माण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. त्यामुळे गरजूंना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळालं पाहिजे,” असं पवार म्हणाले होते.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. गावंडगाव, सुरेगाव, पिंपळ खुटे खुर्द, वाघाळे अशा भागांना भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, “अतिवृष्टीमुळे कांदा, मका, सोयाबीन, टोमॅटो, भाजीपाला यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या असून पुन्हा उभ्या करण्यासाठी तीन-चार वर्षे लागतील. काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहेत. शेतकरी अक्षरशः रडत आहेत. सरकार त्यांच्या पाठीशी मजबुतीने उभं आहे.”
भुजबळांनी सांगितलं की, प्राथमिक मदत सुरू झाली असून ज्या ठिकाणी अन्नधान्य खराब झालं आहे, तिथे दहा किलो तांदूळ वितरित केला जात आहे. काही भागांत पाणी जास्त साचल्यामुळे रोगराई होण्याची भीती असल्याचंही त्यांनी व्यक्त केलं. “शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्र उभा राहायला हवा,” असे आवाहन भुजबळ यांनी केलं.