गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांमध्ये सुमारे 4 कोटी 70 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. त्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर कामांची खातरजमा न करताच बोगस पद्धतीने बिले मंजूर केल्याचा ठपका ठेवला आहे.
शुक्रवारी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आ. बंब म्हणाले की, मतदारसंघातील 8 रस्त्यांच्या आणि काही शाळांच्या इमारतींच्या कामांबाबत कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काम सुरूही झालेले नाही. काही ठिकाणी तर एक रुपयाचेही काम न करता थेट पूर्ण बिलाची मंजुरी देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
बिल मंजुरीदरम्यान GPS फोटो, मोजमाप, वाउचर्स, डांबरीकरणाचे चलन यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे तपासण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदेव काकड, तत्कालीन शाखा अभियंता, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील, तसेच सहायक लेखा व वित्त अधिकारी सहभागी असल्याचे बंब यांनी सांगितले. तसेच वारंवार तक्रारी करूनही मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दुर्लक्ष केल्याने तेही दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला. आणि हे सर्व पैसे ऑगस्ट 2024 मध्ये उचलण्यात आले आहे.
दरम्यान, कार्यकारी अभियंता सुखदेव काकद्र यांनी अनवधानाने काही त्रुटी झाल्याची कबुली दिली असून, "टक्के कामांची तपासणी होते, त्यात चूक झाली असल्यास ती मान्य आहे", असे त्यांनी सांगितले. मात्र जिल्हा परिषदेचे कॅफो चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
"हे प्रकरण न्यायालयात नेण्यात येणार आहे," असे सांगत आ. बंब यांनी दोषींना जामीन मिळू नये यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच काहीजण पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मालमत्ताही विकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली. शाळांच्या वॉल कंपाउंडच्या कामांमध्येही जुन्या फोटोचा वापर करून नव्या बिलांची उचल केल्याचेही त्यांनी उघड केले.