ताज्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : 'युनेस्को गडकिल्ल्यांचे ब्रँडींग करेल, जतन आपल्याला करायचंय'; छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया

शिवकालीन युद्धकलेचे प्रतीक ठरलेले महाराष्ट्रातील 12 ऐतिहासिक गडकोट आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत अधिकृतपणे समाविष्ट झाले आहेत.

Published by : Team Lokshahi

शिवकालीन युद्धकलेचे प्रतीक ठरलेले महाराष्ट्रातील 12 ऐतिहासिक गडकोट आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत अधिकृतपणे समाविष्ट झाले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या दृष्टीकोनातून सुरू झालेला हा प्रयत्न अखेर फलद्रूप ठरला असून, राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा हा सुवर्णक्षण आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी 'लोकशाही मराठी'सोबत साधलेल्या संवादात अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला.

या यादीत रायगड, तोरणा, लोहगड, सुभेदारांचा जिंजी किल्ला यांसह एकूण 12 गडकिल्ल्यांचा समावेश झाला असून, प्रारंभी यादीत नसलेले प्रतापगड, पन्हाळा आणि जिंजी हे किल्ले खास आग्रहाने यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आले आहेत.

2015 पासूनच्या प्रयत्नांना अखेर यश

2015 मध्ये दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये युनेस्कोच्या सल्लागार डॉ. शिखा जैन यांच्यासह छत्रपती संभाजीराजेंची प्राथमिक बैठक झाली. पुढे 2016 मध्ये तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत अधिकृत बैठक पार पडली. याच दरम्यान गडकोटांचा हवाई पाहणी दौरा, अहवाल सादरीकरण, युनेस्कोच्या तज्ज्ञांची भेट आणि संवेदनशील पाठपुरावा अशा टप्प्यांतून हा महत्त्वाचा वारसा दस्तऐवजीकरणाच्या वाटेवर वाटचाल करत राहिला.

2019 मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. डॉ. शिखा जैन यांची मुख्य सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. तर 2024 मध्ये युनेस्को समितीने महाराष्ट्रातील किल्ल्यांना भेट देत अंतिम निर्णय घेतला. याच निर्णयाला आता अधिकृत मान्यता मिळाली आहे.

‘रायगड मॉडेल ’ : स्वखर्ची नियोजनाची यशोगाथा

या प्रक्रियेत रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी स्वतंत्रपणे ‘साईट मॅनेजमेंट प्लॅन’ तयार करण्यात आला. हा आराखडा शासनाने बाहेरून न घेत इनहाऊस विकसित केला. त्यामुळे सुमारे 70 लाख रुपयांची बचत झाली. या यशस्वी उदाहरणाने भविष्यातील इतर किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मार्गदर्शक मॉडेल उभं केलं आहे.

शासकीय समन्वयाचे फलित

या उपक्रमात विनोद तावडे, अमित देशमुख, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांसह सांस्कृतिक सचिव विकास खारगे यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. छत्रपती संभाजीराजेंनी स्वतः अनेक वेळा पुरातत्त्व खात्याशी चर्चा करून जिंजी व प्रतापगडचा समावेश यादीत व्हावा, यासाठी पाठपुरावा केला.

"माझा गड, माझी जबाबदारी"

राजेंनी राज्याभिषेक सोहळ्यात "माझा गड, माझी जबाबदारी" ही टॅगलाइन पुढे आणली. यामागील आशय स्पष्ट करताना ते म्हणाले की, “गडकोटांवरील स्वच्छता, पर्यावरण व शिस्तबद्ध वर्तन ही फक्त शासनाची नाही, तर प्रत्येक शिवप्रेमीचीही जबाबदारी आहे.”

महामंडळ स्थापन करण्याची गरज

गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ किंवा अधिकृत संस्था स्थापण्याची आवश्यकता राजेंनी अधोरेखित केली. पुरातत्त्व खात्याकडे मर्यादित मनुष्यबळ असल्याने व्यापक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र संस्था, विशेष अधिकार आणि मास्टर प्लानची गरज त्यांनी मांडली.

पंतप्रधानांकडून गौरव, जनतेकडून अपेक्षा

या ऐतिहासिक घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरवरून मराठी जनतेला शुभेच्छा दिल्या. “प्रत्येक शिवप्रेमी आणि मराठी माणसासाठी हा गौरवाचा क्षण आहे,” असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं. संभाजीराजे म्हणाले, “मी सुरुवात केली, पण हे श्रेय कोणाचं एकट्याचं नाही. शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आहेत आणि त्यांच्या गडकोटांचं जतन करण्याची जबाबदारी देखील आपली सामूहिक आहे.”

हेही वाचा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pandurang Balkawade : 'किल्ल्यांचं जतन करण्याची जबाबदारी सर्वांची'; इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचं प्रतिपादन

Hindi Language : पवन कल्याण यांचे हिंदीवरील वक्तव्य वादात; प्रकाश राज यांनी केली तीव्र टीका

Ravindra Chavan On Thackeray Bandhu : 'म' मतांचाच हे राज्याला कळलंय'; ठाकरेंच्या युतीवर चव्हाणांचे विधान

Chhatrapati Sambhajinagar : भयंकर ! मुलाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह पाहून आईचा आक्रोश