छत्रपती संभाजीनगर महापालिकेने पाच दिवसांआड पाणीपुरवठ्याची घोषणा केली असली तरी ती प्रत्यक्षात केवळ कागदावरच राहिली असून जुलै महिन्याच्या अखेरीस देखील नागरिकांना उन्हाळ्याप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. काही भागांमध्ये दहा दिवसांनी पाणी येत असून, काही ठिकाणी बारा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आहे.
मे आणि जून महिन्यात शहरात पाणीपुरवठा तुलनेत सुरळीत होता. मात्र जुलै महिन्याची सुरुवात होताच वारंवार जलवाहिनी फुटणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे भर पावसाळ्यात देखील नागरिकांना उन्हाळ्यासारखी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या आठवड्यात जलवाहिनी फुटल्याने सलग दोन दिवस पाण्याचे टप्पे पुढे ढकलावे लागले. त्याअगोदर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर गेला. फक्त दोन आठवड्यांमध्ये तीन वेळा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. परिणामी शहरातील विविध वसाहतींमध्ये दररोज पाण्यासाठी नागरिकांची झगड सुरू आहे.
शहरासाठी नव्याने टाकण्यात आलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून सध्या केवळ २५ ते ३० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. या जलवाहिनीला फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात नवीन पाईप जोडणीचे काम आगामी आठवड्यात होणार आहे. या कामासाठी किमान दोन दिवसांचा शटडाऊन आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तथापि, या जोडणीमुळे शहराला पूर्ण क्षमतेने म्हणजे ७५ एमएलडी पाणी मिळू शकेल, असा प्रशासनाचा दावा आहे.
शहरातील जलकुंभांचे वेळापत्रक देखील पूर्णपणे कोलमडले आहे. एन-५ जलकुंभ (आर-२) मधून दहा दिवसांआड, शहागंज जलकुंभातून बारा दिवसांआड, मरीमाता जलकुंभातून दहा दिवसांआड, जय विश्वभारती जलकुंभातून आठ दिवसांआड, जुबली पार्क जलकुंभातून नऊ दिवसांआड तर गारखेडा जलकुंभातून आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. या सर्व विस्कळीत व्यवस्थेमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, महापालिकेने तातडीने ठोस उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.