शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून पालकमंत्री संजय शिरसाट आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणावरून दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
ही घटना रविवारी (15 जून) रात्री साडेनऊच्या सुमारास ब्रिजवाडी रमाई चौकातील गल्लीत घडली. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर शिवीगाळ, धमकी तसेच घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
इम्तियाज जलील समर्थकांकडून हल्ला
विजय दिलीप चाबुकस्वार (वय 27, रा. ब्रिजवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते रात्री घरी जेवण करून बसले असताना चार जणांनी त्यांच्या घरी येऊन, "इम्तियाज जलील यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट का टाकतो," असे म्हणत बेदम मारहाण केली. त्याचवेळी त्यांच्या आई, मावस भाऊ आणि पुतण्यालाही आरोपींनी शिवीगाळ व मारहाण केली.
याप्रकरणी पोलिसांनी बालाजी खोतकर (33), मनोज भारसाखळे (31), किरण साळवे (32), आणि सावजी म्हस्के (31) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विजय चाबुकस्वार व त्यांच्या नातेवाइकांविरोधात गुन्हा
दुसऱ्या बाजूला, एका 27 वर्षीय महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत, "विजय चाबुकस्वार आणि त्यांच्या घरातील लोकांकडून वारंवार त्रास दिला जात असल्याने माझे पती बालाजी खोतकर हे समजवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आला," असा आरोप केला आहे.
या हल्ल्यात खोतकर यांच्या आई सुमनबाई, भाऊ विशाल आणि महेश यांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावरून विजय चाबुकस्वार, किरण अंगुरे आणि शुभम अंगुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या दोन्ही परस्परविरोधी तक्रारींवरून एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. स्थानिक राजकीय गटांमधील वाद आता थेट समर्थकांच्या रस्त्यावरील भिडंतपर्यंत पोहोचल्याने शहरात खळबळ माजली आहे.
हेही वाचा