छत्रपती संभाजीनगर येथे बांधकाम कामगार कल्याणाच्या नावाखाली शासकीय साहित्य वाटपाचा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू होता. हे लोकशाही मराठीने उघड केले. त्यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली. शासनाच्या बांधकाम कामगारांसाठीच्या योजनेअंतर्गत मोफत दिल्या आहेत. कामगारांना संसार उपयोगी साहित्याच्या वाटपामध्ये दलालांचे वर्चस्व समोर आल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
राज्यशासन बांधकाम कामगारांना 20 ते 25 हजार रुपयांच्या साहित्य किटचे वाटप करत आहे. मात्र, ही योजना दलाल आणि भ्रष्टचारी लोकांसाठी ‘सुवर्णसंधी’ ठरत असल्याचे वास्तव उघड झाले आहे. 'लोकशाही मराठी' ने या प्रकाराचा भांडफोड केल्यानंतर सरकारने तात्काळ दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे. याप्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना एकसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले असून, या गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत (विशेष तपास पथक) चौकशी व्हावी, अशी मागणी खुद्द पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. "सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी दलालांच्या खिशात जात आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आहे," असे शिरसाट यांनी ठामपणे सांगितले.
या प्रकरणाचा गंभीर परिणाम म्हणून दौलताबाद पोलिसांनी तातडीने कारवाई करत दलाल अफसर अकबर शेख याला अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेल्या एक महिला आणि एक पुरुष फरार आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या संसारोपयोगी किटसाठी बायोमेट्रिक प्रक्रियेच्या नावाखाली कामगारांकडून 1500 ते 2000 रुपये, तर किट ताब्यात देण्यासाठी 600 रुपये उकळले जात असल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून पोलिसांनी कारवाई करत दलालाचा पर्दाफाश केला. ‘लोकशाही मराठी’ने या प्रकरणाची गंभीर दखल घेत योजनेतील भ्रष्टाचार, दलालांचे साम्राज्य याविषयी सखोल पत्रकारिता केली. या पत्रकारितेमुळे केवळ गैरप्रकार उघडकीस आले नाहीत, तर शासन यंत्रणेलाही जाग येऊन कारवाईला गती मिळाली आहे.