छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ कृष्णमूर्ती बंधी यांनी नशेसाठी दारूला पर्याय म्हणून गांजा आणि भांगच्या वापरास प्रोत्साहन दिलं जावं असा सल्ला सरकारला दिला आहे. गांजा आणि भांगचं व्यसन असलेले लोक बलात्कार, खून आणि दरोड्यासारखे गुन्हे कमीत कमी करतात असा दावा त्यांनी केला आहे. कृष्णमूर्ती बंधी यांनी शनिवारी गौरेला-पेंद्रा-मारवाही जिल्ह्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. त्याचवेळी त्यांच्या या वक्तव्यावर राज्यातील सत्ताधारी काँग्रेसनं 'एक लोकप्रतिनिधी ड्रग्जचा प्रचार कसा करू शकतो?' असा सवाल केला आहे. कृष्णमूर्ती बांधी हे मस्तुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. NDPS अंतर्गत भांगाची विक्री आणि सेवन प्रतिबंधित आहे, तर गांजाला कायद्यानुसार परवानगी आहे.
भाजप आमदार कृष्णमूर्ती बंधी नेमकं काय म्हणाले?
कृष्णमूर्ती बंधी म्हणाले, 'हे माझं वैयक्तिक मत आहे आणि मी यापूर्वी विधानसभेत यावर चर्चा केली आहे. दारू हे अनेक वेळा बलात्कार, खून, भांडणाचं कारण ठरतं असं मी म्हटलं होतं. त्यावेळी सभागृहात असंही विचारलं होतं की, गांजा सेवन करणाऱ्या व्यक्तीनं कधी बलात्कार, खून, लुटमार केली आहे का? दारुबंदीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने गांजा आणि भांगाकडे आपली वाटचाल कशी करता येईल, याचा विचार केला पाहिजे. लोकांना नशा करायची असेल तर त्यांना अशा गोष्टी दिल्या पाहिजेत, ज्याचं सेवन केल्यावर खून, बलात्कार किंवा इतर गुन्हे होत नाहीत. हे माझं वैयक्तिक मत आहे.