ओडिशातील बोईपारीगुडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पेटगुडा गावाजवळील जंगलात डीव्हीएफ (जिल्हा स्वयंसेवी दल) वापरून जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत कुंजम हिडमा या माओवादी कॅडरला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या जवळील शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
कुख्यात माओवादी कुंजम हिडमाला एके-४७ आणि जड स्फोटकांसह अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजम हिडमाला ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातील बोईपारीगुडा पोलिसांनी पेटगुडा जंगलातून अटक केली आहे. कोरापुट पोलीस आणि डीव्हीएफच्या संयुक्त कारवाईत त्यांना यश मिळाले. डीव्हीएफ टीमने २८ मे च्या रात्री विशेष ऑपरेशन सुरू केले. सकाळी टीमला नक्षलवाद्यांचा एक गट टेकडीवर तळ ठोकताना दिसला.
माओवादींना घेरण्यासाठी पथक पुढे सरकताच त्यांनी डीव्हीएफ पथकावर गोळीबार सुरू केला आणि जंगलात पळून गेले. गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून, पथकाने नियंत्रित गोळीबार केला. शोध मोहिमेदरम्यान, जवळच्या झुडुपात लपण्याचा प्रयत्न करताना माओवादी कॅडरला पकडण्यात आले. तर इतर पळून जाण्यात यशस्वी झाले. व्हीएफ टीमने कुंजमा हिडमा नावाच्या कट्टर माओवाद्याला यशस्वीरित्या अटक केली. कुंजम हिडमा उर्फ मोहन, एसीएम (क्षेत्र समिती सदस्य अशी त्यांची ओळख सांगितली जात असून वडिलांचे नाव स्वर्गीय कुंजम लकमा आहे. तर हा गाव जांगुडा, पोलीस स्टेशन उसूर, जिल्हा विजापूर, छत्तीसगड येथील रहिवासी आहे.
माओवादी हिडमाकडून एक एके-४७ रायफल, ३५ राउंड दारूगोळा, २७ इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, ९० नॉन-इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, २ किलो गन पावडर, २ स्टील कंटेनर, २ रेडिओ, १ इअरफोन, १ मोटोरोला वॉकी-टॉकी, १० बॅटरी, २ चाकू, १ कतुरी (लहान कुऱ्हाड), ४ टॉर्च लाईट, १५ माओवादी साहित्य आणि विविध वस्तू जप्त करण्यात आल्या.