नागपूरमध्ये रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा कायद्यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. काही लोकं या विधेयकातील एकही अक्षर न वाचता विरोध करत असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितलं की, या कायद्यामुळे कुणाचाही आंदोलनाचा अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावला जाणार नाही. हा कायदा वैयक्तिक नव्हे, तर संघटनांविरोधात आहे. कोणत्याही व्यक्तीविरोधात कारवाई करण्याआधी मंडळाची संमती घेणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले. या विधेयकाच्या विरोधात बोलत आहेत ते कडव्या डाव्यांचा एका प्रकारे समर्थन करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता नागपूर येथे केली.
या कायद्यासंदर्भात लोकशाही प्रक्रिया पाळल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्वपक्षीय 25 नेत्यांची समिती तयार करून चर्चा करण्यात आली. त्यात आलेल्या सूचना आणि जनतेकडून प्राप्त 12 हजार अभिप्राय लक्षात घेऊन विधेयकात बदल करण्यात आले. तसेच दोन्ही सभागृहांतून ते संमत करण्यात आलं.
प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेत नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे आभार मानले.. निकम यांचं अभिनंदन करत त्यांनी राष्ट्रभक्तांच्या पाठिशी सरकार उभं आहे, हे यातून स्पष्ट होतं, असं नमूद केलं.
क्रिमिनल जस्टिस सिस्टीमबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, शंभर वर्षांनंतर झालेल्या कायदेशीर सुधारणा न्यायप्रणालीला गती देतील. माओवाद्यांकडून लोकशाही संस्थांमध्ये घुसखोरी केली जात असल्याने त्यांच्या विरोधात ठोस कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा