मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली. फडणवीस म्हणाले की, "मागील काळात महाराष्ट्रात प्रथमच बाराशेपेक्षा अधिक मंडळांची स्थापना झाली. यानंतर 80 संघटनात्मक जिल्ह्यांचे अध्यक्षही लोकशाही पद्धतीने निवडण्यात आले.
आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, आज केंद्रीय मंत्री आणि निवडणूक निरीक्षक किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत आमचे सहकारी श्री. रवींद्र चव्हाण यांचे अधिकृत नामांकन दाखल झाले." यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंकडून करण्यात येणाऱ्या हिंदी सक्तीविरोधात आक्रोशाबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात आलेल्या अहवालावरून फडणवीस म्हणाले की, "त्या अहवालात पहिली ते बारावी हिंदी सक्तीबाबत प्रस्ताव होता, जो त्यांनी मंत्रिमंडळात मान्य केला होता. सध्याच्या सरकारने कोणताही अहंकार न ठेवता विद्यार्थ्यांच्या हितासाठी समिती स्थापन केली आहे आणि निर्णयही त्या अनुषंगाने होईल", असे त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्यावर फडणवीस म्हणाले की, "जर ते एकत्र येत असतील, तर त्यांनी एकमेकांना प्रश्न विचारायला हवेत. उद्धवजींच्या काळात हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला, त्यावर राज ठाकरेंकडून प्रश्न का नाही विचारला जात?" तसेच पुढे पवार गटावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, "जेव्हा सत्तेत होते, तेव्हा हिंदी सक्तीला पाठिंबा देणारे आता विरोध करत आहेत. हे पूर्ण दुटप्पी वागणे आहे. भाजप हा महाराष्ट्राच्या जनतेपुढे आणि संविधानापुढे उत्तरदायी आहे. संविधानाचा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा केला जाईल."