Mumbai Express Highway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सुरू असलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. या दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार बाळा भेगडे यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते. पुणे आणि कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकही यावेळी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला, त्यावेळेस ते म्हणाले की, हा प्रकल्प केवळ वाहतूक सुलभ करणार नाही, तर अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातूनही देशासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल. एकूण तीन बोगद्यांपैकी एक बोगदा तब्बल 9 किलोमीटर लांबीचा आणि 23 मीटर रुंद आहे, जो देशातील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे. समृद्धी महामार्गावरील आधीच्या विक्रमाला मागे टाकणारा हा बोगदा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उभारण्यात येणारा 185 मीटर उंच पूल. हा देशातील सर्वाधिक उंच पूल ठरणार असून यामधून अभियांत्रिकी कौशल्याचे उत्तम उदाहरण दिसून येते, असे फडणवीस यांनी नमूद केले.
पुढे फडणवीस म्हणतात की, "या प्रकल्पाचे सुमारे 94 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रतिकूल हवामान आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत काम करणाऱ्या अभियंत्यांचे आणि कामगारांचे त्यांनी विशेष कौतुक केले.अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उभारण्यात आलेला हा प्रकल्प ‘गेम चेंजर’ ठरेल. पर्यावरणीय व वाहतूकसंबंधी अडचणी दूर करत इंधन बचत आणि प्रदूषण कमी होण्यासाठीही हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे."
‘मिसिंग लिंक’ प्रकल्प केवळ मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास सुकर करणारा नाही, तर अभियांत्रिकी क्षेत्रात देशासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे. महाराष्ट्रातील वाहतूक, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही याचा दूरगामी परिणाम होणार असल्याचे स्पष्ट संकेत या दौऱ्यातून मिळाले.
हेही वाचा...