आज विधान परिषदेच्या सभापतीपदाची घोषणा करण्यात आली. एकच अर्ज आल्याने सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली. विधानपरिषद सभापतीपदासाठी राम शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राम शिंदे यांची एकमताने विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी राम शिंदे यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. या सभागृहाने एकमताने राम शिंदे यांची सभागृहाच्या सभापतीपदी निवड केली. त्याबद्दल मी या सभागृहाचेही आभार मानतो. आपली जी उच्च परंपरा आहे की, सभापती या पदावर जरी नियमात निवडणूक असली तरी शक्यतो सर्वांनी एकमताने सभापतीची निवड करावी. या उच्च परंपरेला साजेसा निर्णय आमच्या विरोधी पक्षाने देखील घेतला. त्याबद्दल मी विरोधी पक्षाचे देखील आभार मानतो. प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चित सवय आहे. मला विश्वास आहे की, आपणही तसेच अतिशय शिस्तीने पण संवेदनशीलतेने या सभागृहाचा कारभार चालवाल. याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही.
यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेक जेष्ठ, अनेक दिग्गज लोकांनी सभापतीचे पद हे भुषवलं आहे, अनेक चळवळीतून पुढे आलेले नेते हे देखील या पदावर बसले आहेत. एवढेच नाही तर या पदावर बसायचे असेल तर नावात राम असले तर जास्त सोपे असते. कारण यापूर्वी रामचंद्र सोमण, रामराव हुक्केरीकर, राम मेघे, रामकृष्ण गवळी, रामराजे नाईक निंबाळकर आणि आता प्राध्यापक राम शिंदे. सगळे राम आहेत. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.