थोडक्यात
विश्वविजेत्या लेकींचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार
विश्वविजेत्या महिला क्रिक्रेटपटूंचा केला सन्मान
‘महिलांच्या क्रिकेटचा नवा अध्याय’
भारताच्या ऐतिहासिक आयसीसी महिला विश्वचषक विजयाचा जल्लोष अजूनही देशभरात सुरू असतानाच महाराष्ट्राच्या तीन तेजस्वी कन्यांचा विशेष गौरव करण्यात आला. मुंबईत झालेल्या एका भव्य समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघातील तडाखेबाज फलंदाज स्मृती मंधाना, विश्वासार्ह मधल्या फळीतली खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स आणि फिरकीपटू राधा यादव यांचा सत्कार केला. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीनही खेळाडूंना स्मृतिचिन्हे प्रदान करत अभिनंदन केले. त्यांनी म्हटलं,
“भारतीय महिला क्रिकेट संघाने केलेला हा ऐतिहासिक विजय केवळ देशासाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. स्मृती, जेमिमा आणि राधा तुम्ही तिघींनी जगासमोर महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं आहे.” कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांनी सांगितलं की, या खेळाडूंनी केवळ मैदानावरच नव्हे, तर देशातील लाखो तरुणींना स्वप्न पाहण्याचं आणि त्यासाठी झगडण्याचं बळ दिलं आहे. “तुमचा विजय हा परिश्रम, शिस्त आणि निष्ठेचा उत्सव आहे. तुमच्या खेळाने भारतीय महिला क्रिकेटचं स्थान जगभर उंचावलं आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
विश्वविजयाची पार्श्वभूमी
२ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर मात करून महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या विजयात स्मृती मंधानाने सडेतोड फलंदाजी करत निर्णायक धावसंख्या उभारली; जेमिमा रॉड्रिग्सने स्थिरता राखत संघाला बळ दिलं; तर राधा यादवच्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाची कोंडी केली.
‘महिलांच्या क्रिकेटचा नवा अध्याय’
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “हा केवळ एका स्पर्धेचा विजय नाही, तर भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात आहे. आज महाराष्ट्राच्या या तीन कन्यांनी जे साध्य केलं आहे, ते पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.” समारंभाला क्रीडाप्रेमी, विद्यार्थी आणि विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांनी या विजयी तिकडीचं जोरदार स्वागत केलं.
कार्यक्रमाच्या शेवटी फडणवीस यांनी सरकारतर्फे महिला क्रीडा विकासासाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला आणि सांगितलं की महाराष्ट्र सरकार महिला क्रिकेटसाठी विशेष पायाभूत सुविधा निर्माण करेल. भारताचा हा विश्वविजय इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला आहे, आणि त्या सुवर्ण विजयात महाराष्ट्राच्या या तीन कन्या चमकत्या अक्षरांनी झळकल्या आहेत.