नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येने राज्य हादरले असताना, भाजप नेत्या चित्रा वाघ आज पीडित कुटुंबियांच्या भेटीस डोंगराळे येथे पोहोचल्या. घरातील मातम, कुटुंबीयांची तगमग आणि चिमुकलीची हृदयद्रावक कहाणी ऐकताना स्वतः चित्रा वाघ यांनाही अश्रू आवरले नाहीत.
घटनेच्या दिवशी हरवलेली ही बालिका नंतर जंगलात निर्घृण अवस्थेत आढळली होती. अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि नंतर खून....या संपूर्ण प्रकरणाने राज्यभर संताप उसळला आहे. आरोपीला फाशीची मागणी जोर धरत असतानाच वाघ यांनी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. पीडितांच्या घरी पोहोचल्यावर दु:खाने हदरलेले कुटुंबीय आक्रोश करत चित्रा वाघ यांच्यासमोर कोसळले. परिस्थिती इतकी विदारक होती की वाघ यांचीही डोळे पाणावले. “कुठल्या शब्दात सांत्वन करू? तीन-साडेतीन वर्षांच्या निष्पाप देवकन्येवर एवढं अमानवीय कृत्य… प्रत्येक आईचं हृदय तुटून जातं,” असे त्यांनी भावनिक स्वरात सांगितले.
घटनेबद्दल संताप व्यक्त करत त्यांनी कठोर शब्दांत आरोपीला शिक्षा व्हावी, असा पवित्रा घेतला. “हा सैतान समोर असता तर त्याला चौकात उभा करून चिरून काढला असता. इतका क्रूर गुन्हा करणाऱ्याला मोकळं सोडणं ही समाजाची चूक ठरेल,” असे वाघ म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक या कुटुंबाच्या पाठीशी आहे. कायद्याच्या मर्यादेत राहूनही या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नाला कमी पडणार नाही.” वाघ यांनी मुख्यमंत्री आणि पोलिसांनी या प्रकरणावर पहिल्या दिवसापासून लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले. “अर्ध्या तासात पोलिसांनी आरोपीला पकडले. आता कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुरावे पक्के केले जात आहेत. लवकरच आरोपपत्र दाखल होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच न्यायप्रक्रिया लवकर व्हावी म्हणून हा खटला सक्षम वकिलांकडे सोपवण्याबाबत आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करण्याचेही आश्वासन दिले.
या भेटीत कुटुंबीयांनी न्यायासाठी आक्रोश केला, तिथले वातावरण शोकमग्न होते. चिमुकलीच्या हृदयद्रावक मृत्यूने गाव थरारले असून आरोपीला सार्वजनिक फाशीची मागणी वाढत आहे. दु:खाने भरलेल्या या कुटुंबाला धीर देताना चित्रा वाघ यांचे शब्द आणि भावनिक प्रतिक्रिया, समाजातील असंतोषाची तीव्रता दर्शवून गेल्या. राज्यभरातून या घटनेचा निषेध होत असून दोषीला कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या मागण्या अधिक तीव्र झाल्या आहेत.