ताज्या बातम्या

Rahul Gandhi : मनोज नरवणेंच्या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा दाखला देत चीनने भारताच्या हद्दीत चार तंबू ठोकल्याचा गंभीर दावा केला.

Published by : Varsha Bhasmare

चीन-भारत सीमावादाच्या मुद्द्यावरून लोकसभेत सोमवारी मोठा गदारोळ पाहायला मिळाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा दाखला देत चीनने भारताच्या हद्दीत चार तंबू ठोकल्याचा गंभीर दावा केला. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र शाब्दिक संघर्ष झाला आणि अखेर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.

लोकसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भारत-चीन सीमारेषेवर सरकार ज्या प्रकारे परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगत आहे, ते वास्तवाशी सुसंगत नाही. त्यांनी दावा केला की, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकात चीनने भारतीय हद्दीत चार तंबू उभारल्याचा उल्लेख आहे. हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून सरकार देशाला सत्य सांगत नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला.

राहुल गांधींचं भाषण सुरू असतानाच सत्ताधारी बाकांवरून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी स्पष्ट केलं की, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील बाबी संसदेत अत्यंत जबाबदारीने मांडल्या पाहिजेत आणि अप्रकाशित पुस्तकातील संदर्भ देऊन सभागृहात चर्चा करणे योग्य नाही. यावर प्रत्युत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, पुस्तकात नमूद केलेल्या गोष्टी या अधिकृत आहेत आणि त्या देशाच्या सुरक्षेशी निगडित असल्याने त्यावर चर्चा होणं आवश्यक आहे. “मी कोणताही गोपनीय दस्तऐवज उघड करत नाही, तर एका माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकातील माहितीचा संदर्भ देतोय,” असं राहुल गांधी म्हणाले.

मात्र, लोकसभा अध्यक्षांनी या मुद्द्यावर हस्तक्षेप करत स्पष्ट भूमिका घेतली. अध्यक्षांनी सांगितलं की, अद्याप प्रकाशित न झालेल्या पुस्तकातील किंवा अधिकृतरीत्या संसदेसमोर न आलेल्या बाबींवर सभागृहात चर्चा करता येणार नाही. “छापलेल्या किंवा अप्रकाशित पुस्तकातील गोष्टींचा संदर्भ देऊन सभागृहाचं कामकाज अडवणं योग्य नाही,” असं सांगत अध्यक्षांनी राहुल गांधींना विषय बदलण्याचे निर्देश दिले.

तरीही गदारोळ थांबला नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू राहिल्याने लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं. नंतर परिस्थिती नियंत्रणात न आल्याने अखेर दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या मुद्द्यावर मंगळवारी पुन्हा एकदा लोकसभा गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसकडून सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरणाची मागणी करण्यात येत असून, सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली राहुल गांधींवर गैरजबाबदार वक्तव्याचा आरोप करत आहे. चीन-भारत सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा संसदेत केंद्रस्थानी आला असून, यावरून येत्या काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा