तामिळनाडूच्या कोइम्बतूर जिल्ह्यातील एका १३ वर्षीय मुलीला मासिक पाळी येत असल्याने तिच्या खासगी शाळेच्या वर्गाबाहेर असलेल्या जिन्यावर परीक्षा देण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेबद्दल सेनगुट्टैपलयम गावातील उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे, असे जिल्हा शालेय शिक्षण विभागातील उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुलीच्या आईने रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये ती जिन्यावरून परीक्षा लिहित असल्याचे दाखवले आहे, तो बुधवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. व्हिडिओमध्ये, अरुणथथियार समुदायातील ही मुलगी सांगते की, तिच्या शिक्षिकेने मुख्याध्यापकांना ती तारुण्यवस्थेत पोहोचल्याचे सांगितल्यानंतर तिला तिच्या वर्गात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी शाळा व्यवस्थापनाने चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्याध्यापिकेला निलंबित केले होते. शालेय शिक्षण विभाग आणि पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत असे आढळून आले की, मुलीची पहिलीच मासिक पाळी असल्याने तिच्या आईने तिच्यासाठी परीक्षा देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची विनंती केली होती.
"प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की आईला या व्यवस्थेची माहिती होती. सध्या आठवीत शिकणाऱ्या मुलीला ५ एप्रिल रोजी मासिक पाळी सुरू झाली. ७ एप्रिल रोजी तिला विज्ञानाची परीक्षा आणि ९ एप्रिल रोजी सामाजिक शास्त्राचा पेपर जिन्यावर बसवून देण्यास भाग पाडण्यात आले," असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
"शाळेने हा निर्णय आईच्या पसंतीनुसार घेतल्याचा आग्रह धरला असला तरी, तिच्या मुलीला डेस्कशिवाय परीक्षा देताना पाहून आई नाराज झाली. शालेय शिक्षण विभागाच्या चौकशीसोबतच आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे," असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.