उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले असून त्यातच उत्तरकाशीमध्ये शनिवारी ढगफुटी झाल्याने मोठी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. यमुनोत्री महामार्गावर पालीगाड ओजरी डाबरकोट येथे ही ढगफुटी झाली असून तेथे काम करणारे 8 ते 9 कामगार बेपत्ता आहेत. सध्या तिथे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून त्यातील 2 कामगारांचे मृतदेह रात्री उशिरा 18 किलोमीटर दूर तिलाड़ी शहीद स्मारकच्या जवळ सापडले. या ढगफुटीमुळे ओजरी डाबरकोट परिसरात मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. या पावसाने गेले दोन तीन दिवस उत्तराखंडमधील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यातच आता शनिवारी संध्याकाळी ढगफुटी झाल्याने तिथे मोठी दुर्घटना घडली. ओजरी डाबरकोट येथे रस्त्याचे बांधकाम चालू होते. तेव्हा तिथे काही कामगार काम करत होते. तर काही कामगार तिथेच आपले घर बांधून राहत होते. शनिवारी संध्याकाळी अचानक ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्याने तिथे काम करणारे 9 कामगार वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे बचाव पथक आणि SDRF चे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या तिथे बचावकार्य सुरु असून बेपत्ता झालेल्या कामगारांचा शोध वेगाने सुरु आहे, अशी माहिती उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत कार्य यांनी दिली.
या ढगफुटीमुळे ओझरीजवळचा रस्ता हा पूर्णपणे खचला असून यमुना नदीच्या पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे उत्तराखंडमधील नागरिकांना याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा