महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातल्यानंतर आता पुन्हा एकदा ढगाळ हवामान आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज व्यक्त करताना सांगितले की, १५ ऑक्टोबर (बुधवार) ते २० ऑक्टोबर (सोमवार - नरक चतुर्दशी) या कालावधीत राज्यात अनेक भागांत आकाश ढगाळ राहील आणि काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात कुठे किती पाऊस?
खुळे यांच्या अंदाजानुसार, १५ आणि १६ ऑक्टोबर या दोन दिवसांत राज्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. मात्र, पावसाचा जोर फारसा नसल्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. पावसाची तीव्रता मागील आठवड्याच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे.
यावेळी ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीशी घसरण होण्याची शक्यता असून, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व कोकण भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात.
शेतकऱ्यांसाठी दिलासा की चिंता?
गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान झालं होतं. उभ्या पिकांवर परिणाम झाला असून, काही ठिकाणी जमीनही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
मात्र, खुळे यांनी स्पष्ट केलं की, रब्बी हंगामाच्या चौथ्या आणि पाचव्या पावसाळी आवर्तनातील हा पाऊस उपयुक्त ठरू शकतो. या काळातील आर्द्रता आणि हलक्या पावसामुळे रब्बी पिकांच्या पेरणीसाठी पोषक हवामान मिळण्याची शक्यता आहे.
मान्सून परतीचा टप्पा अंतिम चरणात
भारतामधून मान्सूनचा परतीचा प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचला असून, देशाच्या ८५% भागातून मान्सून परतला आहे. उर्वरित भागात दोन-तीन दिवसांत परतीचा मान्सून पूर्ण होईल, असा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
सध्या परतीचा मान्सून कारवार, कलबुर्गी, निझामाबाद, केओंझघर, सागर आयलंड, गुवाहाटी आदी शहरांपर्यंत पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सून १५ ऑक्टोबरच्या आसपास भारतातून पूर्णपणे परतेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.