निवडणूक शाईवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या शंकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी तर म्हणतो ऑईल पेंट वापरावा" असा टोला लगावत विरोधकांच्या आरोपांतील हवा काढून घेतली आहे.
राज्यात अनेक ठिकाणाहून निवडणूकीनंतर बोटावरील शाई निघून जात असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूकीत वापरण्यात येणाऱ्या 'मार्कर पेन'बाबत हरकत घेतली. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेत 'मार्कर पेन' आताच वापरात नाही, तर यापूर्वी देखील अनेकदा तो वापरण्यात आल्याचे सांगितले. विरोधकांना शंकाच असेल तर आयोगाने दुसरा पेन वापरावा. ते सुद्धा जाऊ द्या, 'मी तर म्हणतो, ऑईल पेंट वापरावा', असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर कोणत्याही प्रकारचा संशय घेणे अयोग्य असल्याचे ठामपणे सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या 'मार्कर पेन' विषयक आरोपांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, निवडणुकीशी संबंधित सर्व निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतले जातात आणि यापूर्वीही अनेक वेळा अशाच प्रकारचा पेन वापरण्यात आला आहे.
थोडक्यात
• राज्यातील अनेक ठिकाणाहून मतदानानंतर बोटावरील शाई निघून जात असल्याच्या तक्रारी..
• मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या 'मार्कर पेन'वर हरकत घेतली.
• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेतली.
• फडणवीस म्हणाले, 'मार्कर पेन आताच वापरात नाही, यापूर्वी देखील अनेकदा वापरण्यात आला आहे'.
• विरोधकांना शंका असल्यास आयोग दुसरा पेन वापरू शकतो.
• फडणवीसचा ट्विस्ट: "मी तर म्हणतो, ऑईल पेंट वापरावा"