Devendra Fandvis : विधानसभेच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर संतापले. ते बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या भविष्यावर चर्चा केली, योजनेचा ठाम रुख व्यक्त केला आणि विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले, “महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२९-३० मध्ये १ ट्रिलियन डॉलर करण्याचं माझं उद्दिष्ट आहे. हे लक्षात ठेवा, आपला विकास रोडमॅप तयार झाला आहे. २०४७ पर्यंत महाराष्ट्र जगातील सर्वात सक्षम राज्य होईल.”
फडणवीस यांनी शिवरायांचा इतिहास शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला असल्याचं सांगितलं आणि विरोधकांना प्रत्युत्तर देताना, “मुंबई कधीच महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ शकत नाही,” असे ठामपणे सांगितले. तसेच, त्यांनी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या मोफत वीज योजनांविषयीही स्पष्टपणे सांगितले की, या योजनांमध्ये कोणताही बदल होणार नाही. या योजना पुढेही सुरू राहतील.
विरोधकांच्या गदारोळाबद्दल फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आणि एक आमदार खडसावत म्हणाले, “तुम्हाला सभागृहाची शिस्त माहित नाही. राजकारणाच्या मुद्द्यांवर खोट्या आरोपांवर भाष्य करणं योग्य नाही.” त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना शांत राहण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात राजकारण, योजनांची अंमलबजावणी आणि राज्याच्या भविष्यातील दिशा यावर जोरदार चर्चा झाली.