CM Fadnavis On BDD Chawl Redevelopment : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या पुनर्वसन इमारतीचे उद्घाटन आणि 556 सदनिकांच्या चाव्यांचे वितरण आज करण्यात आले. माटुंग्यातील यशवंत मंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास हे दिवंगत गोपिनाथ मुंडे यांचे स्वप्न होते, असे सांगितले आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पही आता राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली एक आठवण सांगितली आहे.
ते म्हणाले की, "ही केवळ चाळ नव्हती. या चाळीमध्ये अनेक परिवर्तनाचा इतिहास जोडलेला आहे. आमचा बीडीडी चाळीशी संबंध आला तो म्हणजे आमचे नेते गोपीनाथ मुंडेंनी बीडीडी चाळीतील पोलिसांना घर मिळून देण्यासाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर त्याच वरळीतील बीडीडी चाळीतील भागात आमची सभा झाली होती. नागरिकांच्या हक्काच्या मागण्या, पोलिसांच्या हक्काच्या घराच्या मागण्यासाठी सभा घेतली होती. यानंतर काही लोकांच्या घरी जाण्याचा मला संधी मिळाली. ३० ते ५० वर्षे कशा अवस्थेत लोक राहत होते अतिशय वाईट परिस्थितीमध्ये ही लोक राहत होते. सिलिंग पडत होती, ती एक रुम होती, त्याला सुद्धा पडदे लावले होते. म्हणण्यासाठी ती चाळ होती, ती तिची परिस्थिती झोपडपट्टी पेक्षा वाईट होती.
पुढे ते म्हणाले की, "आपल्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार आले, तेव्हा निश्चय केला, आता आपण मागण्या करत होतो, आता मागण्या पुर्ण करण्याची वेळ आली आहे. त्यानंतर बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा मुद्दा आपण ऐरणीवर घेतला. बीडीडीबद्दल बोलं जातं पण त्याचा विकस होत नाही. पुनर्विकास बिल्डर करेल या अपेक्षेने ते राहिले होते. चार ते पाच आराखडे पूर्ण होऊ शकले नाही. कारण बिल्डरला सेलेबलचा इंटरेस्ट होता वेगवेगळे बिल्डर फिरायचे. मी संकल्पना मांडली की बिल्डर ची आवश्यकता काय?"