थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
मुंबईत थंडीची तीव्रता वाढली आहे. रविवारी शहराचा पारा थेट 17 अंशांपर्यंत खाली आला. किमान तापमानात सरासरीपेक्षा चार अंशांची मोठी घट झाली. त्यामुळे सुट्टीच्या सकाळी मुंबईकर चांगलेच गारठले. त्यानंतर दिवसभर हवेत माथेरानसारखा गारवा राहिला. उर्वरित राज्यातही कडाक्याची थंडी पडली असून आणखी आठवडाभर थंडीची तीव्रता जास्त असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या आठवड्यापासून मुंबईच्या वातावरणात बदल झाला आहे. मागील चार-पाच दिवस शहराचे किमान तापमान 20 अंशांच्या खाली नोंद होत आहे. रविवारी त्यात यंदाच्या हंगामातील विक्रमी घसरण झाली आणि सांताक्रूझमध्ये 17.8 अंश इतके किमान तापमान नोंद झाले. याच वेळी कुलाब्यात 22.3 अंश तापमान हेते. तसेच पवईत 19 अंश, मुलुंड 17 अंश, चेचेंबूर 17 अंश, बोरिवली 17 अंश, वरळी -19 अंश अशाप्रकारे शहराच्या बहुतांश भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी कमी नोंद झाले. सोमवारी शहरात 16 अंश इतके किमान तापमान राहील, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे. मुंबईचे तापमान थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये नोंद होणाऱ्या तापमानाच्या जवळपास आहे. रविवारी माथेरानमध्ये 16.8 अंश, डहाणूमध्ये 16.9 अंश, तर ठाणे शहरात 20 अंश किमान तापमानाची नोंद झाली.
राज्याच्या ग्रामीण भागात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमधील किमान तापमान 10 ते 12 अंशांच्या पातळीवर खाली आले. महाबळेश्वर, मालेगाव, जळगाव, नांदेड, परभणी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी 11 अंशांची नोंद झाली, तर अहिल्यानगर, पुणे, बारामती आदी ठिकाणी थेट 10 अंशांपर्यंत पारा घसरला, तापमानाच्या या घसरणीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना हुडहुडी भरली आहे.
आगामी हवामान अंदाज
सध्याचे कोरडे हवामान आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कायम असल्याने, महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांतही किमान तापमानातील घट कायम राहील. दिवसा ऊन असले तरी रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका अधिक जाणवेल.