पुणे महापालिकेतील नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यागत कक्षाची सेवा आता केवळ आठवड्यातून एकदाच उपलब्ध असणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भात नवा आदेश जारी केला आहे. याआधी हे कक्ष सोमवार आणि गुरुवार अशा दोन दिवस सुरू राहायचे.
आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयानुसार, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी स्वत: आयुक्त उपस्थित राहणार असून उर्वरित सोमवारी अतिरिक्त आयुक्त नागरिकांच्या समस्या ऐकणार आहेत. या बैठकीत अतिक्रमण, बांधकाम परवाने, पाणीपुरवठा आणि मिळकतकर विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तक्रारींवर तातडीने कारवाई व्हावी आणि नागरिकांना त्यांच्या अडचणी सांगण्यासाठी एक निश्चित वेळ मिळावा, यासाठी हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक सोमवारी दुपारी 4 ते 5:30 या वेळेत नागरिक आपली तक्रार सादर करू शकतात. पूर्वीचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे, सध्याच्या आयुक्तांनी ही योजना सुधारित रूपात पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.