पुण्यातील भोर तालुक्याचे माजी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी, 22 एप्रिल रोजी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी रविंद्र चव्हाण, सदाभाऊ खोत, राधाकृष्ण विखे-पाटील यांसह इतर नेतेमंडळी उपस्थित होते. संग्राम थोपटे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा थोपटे यांचा निर्णय काही स्थानिक नेत्यांना खटकला असून या निर्णयाविरोधात त्यांनी प्रदेश नेतृत्वाला पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, "जेव्हा बाहेरचे लोक घरात वाढतात, तेव्हा घरातील सदस्यांना बाहेर झोपावे लागते," अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे थोपटे यांच्या प्रवेशावर टीका केली आहे.
भोर तालुक्यात तब्बल चार दशकांपासून राजकीय वर्चस्व राखणाऱ्या थोपटे कुटुंबाला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला होता. त्या पराभवानंतर संग्राम थोपटे यांनी आपले राजकीय भवितव्य ओळखून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, "पक्षात कार्य करत असलेल्या स्थानिकांना डावलून बाहेरून नेते आणले जात आहेत, जे पूर्वी पक्षावर टीका करत होते, तेच आता त्याचा भाग बनत आहेत. यामुळे पक्षात नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे."