काँग्रेसच्या इंडिया आघाडीच्या बैठकीतील एका फोटोनं महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ७ ऑगस्ट रोजी रात्री दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांसाठी जेवणाचे आयोजन केले होते. देशातील विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत असतानाच, एका फोटोत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे शेवटच्या रांगेत बसल्याचं दिसून आलं.
यावरून शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. या वादात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उतरले असून त्यांनी खोचक टीका केली आहे.
“स्वाभिमान विकणाऱ्यांना अपमानाची जाणीव होत नाही” – शिंदे
माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, “काँग्रेसने त्यांना (उद्धव ठाकरे) त्यांची जागा दाखवली. जर त्यांना याचा अपमान वाटत नसेल तर मी काय बोलणार? ज्यांचा अवमान झाला तरी त्यांना काही वाटत नाही, कारण त्यांनी स्वाभिमान घाण टाकला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, विकले, तर अशा गोष्टींचा त्रास होणारच नाही. विचार नेहमी पुढे असतात आणि लाचार नेहमी मागे असतात.”
शिंदेंनी पुढे प्रश्न उपस्थित केला – “उद्धव ठाकरे एवढ्या मागच्या रांगेत का बसले? हा प्रश्न त्यांनाच विचारावा.” तसेच काँग्रेससोबत हातमिळवणी करून ठाकरे गटाने शिवसेनेच्या मूळ विचारांना तिलांजली दिली असल्याचाही आरोप त्यांनी केला.
एनडीए बैठकीत शिंदे गटाचा सन्मान
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या एनडीएच्या महत्त्वाच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देशभरातून आलेल्या प्रतिनिधींच्या डेलीगेशनचे प्रमुख म्हणून सहभागी झाले. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, हिंदुत्व आणि विकास धोरण यावर त्यांनी ठाम भूमिका मांडली. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना फित बांधून सन्मानितही केले.
बैठकीनंतर श्रीकांत शिंदे म्हणाले,
“२४ लाख अकाउंट्सच्या चौकशीचा उद्देश पारदर्शकता आहे. मग काहींना त्यात अपमान का वाटतो? स्वाभिमानाच्या विचारांना प्राधान्य दिलं पाहिजे.”
राजकीय तापमान चढले
या घडामोडीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. काँग्रेस बैठकीतील ‘सीटिंग अरेंजमेंट’वरून शिंदे गट उद्धव ठाकरेंवर सतत निशाणा साधत असताना, ठाकरे गट मात्र या वादावर मौन बाळगत असल्याचं दिसत आहे.