बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मस्साजोग ते बीड सद्भावना रॅली काढण्यात आली आहे. त्याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मस्साजोगमध्ये भेट दिली. त्यांनी देशमुख कुटुंबियांचं सांत्वन देखील केलं.
या रॅलीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. आज ही सद्भावना रॅली बीडमध्ये दाखल होणार असून या यात्रेत काँग्रेसचे अनेक पदाधिकारीही सहभागी होणार आहेत.