आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेसने एनसीपी प्रमुख शरद पवार यांच्याकडे महत्त्वाची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी पवार यांची भेट घेऊन “मनसेला सोबत घेऊ नका” अशी स्पष्ट भूमिका मांडल्याचे काँग्रेस सूत्रांकडून समजते. वर्षानुवर्षे मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस व शरद पवार यांच्या एनसीपीमध्ये नैसर्गिक आघाडीचे समीकरण राहिले आहे. हीच परंपरा आगामी निवडणुकीतही कायम राहावी, अशी ठाम इच्छा काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली. याबाबत बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, “मागील अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि पवार साहेबांची एनसीपी नैसर्गिकरित्या एकत्र राहिली आहे. येणाऱ्या काळातही ही आघाडी कायम राहावी, ही आमची मनापासूनची अपेक्षा आहे.”
यावेळी त्यांनी मनसेसोबत जाण्याबाबत काँग्रेसची ठाम नाराजी व्यक्त केली. “धडपशाही करणाऱ्या किंवा कायद्याचा गैरवापर करणाऱ्या लोकांसोबत काँग्रेस जाऊ शकत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे,” असे गायकवाड म्हणाल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोड़ो यात्रा’द्वारे देशात एकोपा आणि प्रेमाचा संदेश दिल्याची आठवण करून देताना त्या पुढे म्हणाल्या, “मुंबईचा प्रश्न हा धर्म–जात–भाषा यांच्या वादात न पडता सोडवला जावा. मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष देणे आवश्यक आहे.”
त्यांच्या मते, कोणत्याही आघाडीचा पाया म्हणजे समान कार्यक्रम. “काँग्रेसने नेहमी कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारेच आघाड्यांमध्ये सहभाग घेतला आहे. एनडीए असो वा महाविकास आघाडी—संविधानिक मूल्यांचा धागा न सोडता आम्ही काम केले आहे,” असे त्या म्हणाल्या. दोन्ही पक्षांचे काही नेते एकत्र येण्याबाबत चर्चा करत असतानाच काँग्रेसने पवारांना थेट चर्चा व्हायला हवी होती, अशी नोंदही केली. “जर दोन भाऊ एकत्र आले तर त्यांना शुभेच्छा; पण अशा महत्त्वाच्या निर्णयांपूर्वी आमच्याशी संवाद व्हायला हवा होता,” असे काँग्रेसने स्पष्ट केले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही भेट आणि भूमिका महत्त्वाची ठरत आहे. मनसेसोबत जाण्याचा प्रश्न आता शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.