राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली असून, कोल्हापूर आणि सोलापूर महानगरपालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून राजकीय हालचालींना वेग दिला आहे. सोलापूर महापालिका निवडणूक 2026 साठी काँग्रेसने पहिल्या टप्प्यात 10 प्रभागांतील 20 उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह अनेक अनुभवी आणि प्रभावी नावांचा समावेश आहे.
सोलापुरातील काँग्रेसच्या पहिल्या यादीत माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या सून सीमा यलगुलवार, माजी महापौर आरिफ शेख यांच्या कन्या सबा परवीन शेख तसेच माजी महापौर संजय हेमगड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावरून काँग्रेसने अनुभव आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट होत आहे. स्थानिक पातळीवर मजबूत पकड असलेल्या उमेदवारांना संधी देत काँग्रेसने सोलापुरात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठीही काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, तब्बल 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार शाहू छत्रपती महाराज, विधानपरिषदेतील गटनेते व जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार, तसेच आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार मालोजीराजी छत्रपती आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी निश्चित करण्यात आली.
कोल्हापूरच्या यादीत अनेक दिग्गज माजी नगरसेवकांचा समावेश असून, यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा महापालिकेत सत्ता मिळवण्याच्या दिशेने निर्णायक पावले टाकत असल्याचे चित्र आहे. दोन्ही शहरांतील उमेदवार याद्यांमुळे राजकीय वातावरण तापले असून, पुढील टप्प्यातील उमेदवारी घोषणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.