घराघरांत आनंद घेऊन येणारा प्रकाशोत्सव म्हणजेच दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. मुंबईसह राज्यातील इतर शहरांमधील बाजारांत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची रिघ लागली. वस्तू-सेवा कर कमी झाल्याने अनेक वस्तूंच्या किमती कमी झाल्या असून ग्राहकांची मागणीही वाढली आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला असून मोठ्या प्रमाणावर वाहनखरेदीही करण्यात आली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाल्याने सुवर्ण बाजारतही चैतन्य निर्माण झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीच्या स्वागतासाठी बाजारपेठा विविध वस्तूंनी फुलल्या आहेत. फराळाचे जिन्नस, मिठाईने हलवायांची दुकाने सजली असून लाल-पिवळा गोंडा आणि निरनिराळ्या फुलांनी फुलबाजार सजले आहेत. त्याच वेळी निरनिराळ्या आकाराचे, रंगसंगतीचे आकाश कंदील बाजारपेठांच्या आकर्षणात भर घालत आहेत. त्यामुळे बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या आहेत.
सरकारने यंदा फक्त एसी आणि एलईडीवरील वस्तू सेवा करात (जीएसटी) कपात केली असली, तरी इलेक्ट्रॉनिकस उपकरणांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर स्मार्ट फोन, लॅपटॉप, धुलाई यंत्र, फ्रीज, स्वयंपाकघरातील उपकरणांमधील मायक्रोवेव्ह, मिक्सर-ग्रायंडर, एकर फ्रायर आदी वस्तूंनाही मागणी वाढल्याचे निदर्शनास आले आहे.