राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा वाद मोठ्या प्रमाणात पेटला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, मध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असे वाद अनेकदा घडल्याचे पाहायला मिळाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला खरा, मात्र अजूनही काही ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम स्थान असलेलं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातच मराठी भाषेला वाईट वागणूक मिळत असल्याने आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील डी मार्ट येथे मराठी भाषेवरून कर्मचारी आणि ग्राहकामध्ये नवा वाद निर्माण झाला आहे.
नेमकं काय घडलं?
अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील डी मार्टमध्ये एका ग्राहकाने डीमार्टमधील कर्मचाऱ्याला मराठीत बोलण्याची विनंती केली, मात्र कर्मचाऱ्याकडून ग्राहकाच्या मराठी बोलण्याच्या मागणीला नकार दिला. एवढचं नाही तर त्या कर्मचाऱ्याने "मी मराठी बोलणार नाही, हिंदीतच बोलणार, मी मराठीत नाही बोललो तर तू काय करणार? तुला काय त्रास आहे?, मला मराठी शिकवायला आला आहेस का?"अशा प्रकारे त्याने उद्धटपणे ग्राहकासोबत वार्ता केली.
मनसेकडून कर्मचाऱ्याची मनसे स्टाईल खरडपट्टी
तसेच या कर्मचाऱ्याला मनसेकडून चांगलाच शाब्दिक चोप देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या ग्राहकासोबत त्या कर्मचाऱ्याने वाद घातला तो मनसेचा पदाधिकारी होता. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याची मनसे स्टाईलमध्ये कान उघडणी केली. "महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावंच लागेल. मराठी बोलता येत नसेल तर तुमच्या गावी जाऊन नोकरी करायची, इथे यायचं नाही", असं वर्सोव्याचे मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेकडून त्या कर्मचाऱ्याला सांगण्यात आलं. तसेच या प्रकरणी डीमार्टमधील कर्मचाऱ्याने कानाला हात लावून माफी मागितली. मात्र, त्या कर्मचाऱ्याच्या या उर्मट वर्तवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.