भिवंडी शहरातील कोंबडपाडा परिसरात गांजाची तस्करी करत असलेल्या मनसेच्या भिवंडी शहर उपाध्यक्षाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. कुमार व्यंकटेश पुजारी (वय 34) असे अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव असून, त्याच्याकडून तब्बल 3 किलो 960 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1 लाख 28 हजार रुपये असून, त्यामध्ये गांजा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई कोंबडपाडा परिसरातील एका मोकळ्या मैदानात करण्यात आली. पुजारी हा स्वतःच्या फायद्यासाठी गांजाची साठवणूक व विक्री करत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्याच्या विरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले आहे. मनसेसारख्या पक्षाच्या भिवंडी शहर उपाध्यक्षाच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास भिवंडी गुन्हे शाखा करत आहे.