कल्याण प्रतिनिधी | सुरेश काटे : बाजारपेठ पोलिसांनी आज मारामारी, चोरी सारखे 12 गुन्हे दाखल असलेल्या इब्राहिम इस्माईल माजिद उर्फ पापा हड्डी यालासापळा रचून अटक केली आहे. आठ महिने फरार असलेल्या पापा हड्डीच्या अटकेचा थरार तब्बल तासभर चालल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी त्याचे सगळे मनसुबे उधळून लावले अन् त्याला बेड्या ठोकल्या. (Papa Haddi Arrested by Bajarpeth Police)
कुख्यात गुन्हेगार असलेला पापा हड्डी हा त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी सापळा रचला. पोलिसांनी घराला त्याच्या चारीह बाजूंनी घेरलं.
पोलिसांची चाहूल लागताच पापा हड्डी घराच्या टेरेसवर जाऊन लपला. टेरेसवरील कठडय़ाच्या पलीकडे तो लपून बसला. टेरेसच्या पत्र्यावर पोलिसांना दिसू नये यासाठी त्याने अंगावरील कपडे काढले केवळ अंडरवेअरवर होता. पोलिस आणि हड्डी यांच्यात काही वेळ लपाछपीचा खेळ सुरु होता. टेरेसवर हड्डीच्या पायाचे ठसे दिसले. त्यावरुन पोलिसांना खात्री पटली की तो इथेच लपून बसला आहे.
पोलिस टेरेसवरुन हटत नाही हे पाहून हड्डीने टेरेसवरुन उडी मारली. तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी खाली दबा धरुन बसलेला पोलिस नेमका त्याच्या समोर आाला. त्याने पोलिसांना झटका देत तिथूनही पळ काढण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर त्याला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर त्याने रस्त्यातील उभी असलेली बाईक ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचे सगळे मनसुबे उधळून लावत त्याला अखेर पकडलं. हड्डी याच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत.