क्रिस्टियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिग्ज यांनी आपल्या नात्यातील महत्त्वाचा टप्पा पार करत अधिकृत साखरपुडा जाहीर केला आहे. अनेक वर्षे चाहत्यांच्या नजरा या जोडप्यावर खिळलेल्या असताना, अखेर त्यांनी आनंदाची बातमी दिली. 31 वर्षीय जॉर्जिनाने सोशल मीडियावर आपल्या बोटातील चमचमत्या अंगठीचा फोटो शेअर करत स्पॅनिश भाषेत लिहिले, “हो, मी तयार आहे. या जन्मात आणि सर्व जन्मात.” तिच्या बोटातील या एंगेजमेंट रिंगची किंमत तब्बल 43 कोटी आहे.
दोघांची ओळख 2016 मध्ये झाली, जेव्हा माद्रिदमधील एका गुच्ची स्टोअरमध्ये जॉर्जिना विक्री सहाय्यक म्हणून काम करत होती. त्या क्षणापासून सुरू झालेली मैत्री 2017 च्या सुरुवातीला प्रेमसंबंधात बदलली. या काळात त्यांनी एकत्र कुटुंब उभे केले. अलाना मार्टिना आणि बेला एस्मेराल्डा या दोन मुलींचा जन्म झाला. जॉर्जिनाने रोनाल्डोची इतर तीन मुलेही आपल्याच मुलांसारखी सांभाळली. मात्र, 2022 मध्ये त्यांच्या जुळ्या बाळांपैकी एका मुलाचा जन्मानंतर मृत्यू झाल्याने त्यांच्या जीवनात दु:खद घटना घडली.
अर्जेंटिनात जन्मलेली आणि स्पेनमधील जाका येथे वाढलेली जॉर्जिना लहानपणापासून नृत्याचे प्रशिक्षण घेत होती. नंतर ती माद्रिदला गेली आणि किरकोळ विक्री, मॉडेलिंग व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग अशा विविध क्षेत्रांत काम केले. तिने फॅशन मोहिमांमध्ये सहभाग घेतला, स्वतःचे व्यवसाय सुरू केले आणि आय अॅम जॉर्जिना या नेटफ्लिक्स मालिकेतून आपल्या जीवनाचा काही भाग चाहत्यांसमोर मांडला.
सध्या हे कुटुंब युरोप आणि सौदी अरेबिया येथे सोबत वेळ घालवत आहे, जिथे रोनाल्डो अल-नस्र क्लबसाठी खेळतोय. रिअल माद्रिद, युव्हेंटस आणि मँचेस्टर युनायटेडसारख्या क्लब्समधील यशस्वी कारकीर्दीनंतर त्याचा हा नवा टप्पा आहे. अनेक वर्षांच्या सहवासानंतर रोनाल्डोने विचारलेला प्रश्न आणि जॉर्जिनाचा दिलखुलास ‘हो’ हा क्षण त्यांच्या नात्याला नव्या उंचीवर घेऊन गेला.