बीड जिल्ह्यात गाजलेल्या बनावट पीक विमा प्रकरणानंतर आता नांदेडमध्येही असाच पीक विमा घोटाळा समोर आला आहे. सोमवारी रात्री उशिरा नांदेड पोलिसांत या संदर्भात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत धक्कादायक बाब समोर आली असून तब्बल 40 सेतू सुविधा केंद्रांमधून 4 हजार 453 शेतकऱ्यांच्या नावावर बनावट विमा भरला गेला आहे.
विशेष म्हणजे या केंद्रांपैकी 9 केंद्र चालक बीड जिल्ह्यातील परळी भागातील आहेत. इतकंच नव्हे तर, काही एजंट्सनी तर थेट उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची माहिती वापरून नांदेडमध्ये पीक विमा भरला आहे.
पंतप्रधान पीक विमा योजना केंद्र सरकार आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून राबवली जाते. मात्र 2024 पासून काही शक्कलबाज एजंट्सनी नियम धाब्यावर बसवून, संस्थांच्या किंवा शासनाच्या मालकीच्या जमिनींच्या नावावर, कोणतीही कायदेशीर परवानगी किंवा संमतीपत्र नसताना विमा भरायला सुरूवात केली.
या गैरप्रकारात पुणे, परभणी, लातूर, जालना, नांदेड आणि यूपीतील एजंट्सचाही सहभाग असल्याचं उघड झालं आहे. या बनावट व्यवहारामुळे सरकारी योजनांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
दरम्यान, या घोटाळ्यावर विधानसभेत विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. "शेतकऱ्यांना काहीच फुकट मिळत नाही. सरकार जीएसटीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून 11 हजार रुपये उकळते," असा जोरदार आरोप विरोधकांकडून करण्यात आला.
हेही वाचा