मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर पुन्हा एकदा एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, २६ जानेवारी २०२६, प्रजासत्ताक दिनापासून सीएसएमटी/वडाळा रोड ते पनवेल मार्गावर एसी लोकल धावणार आहेत. त्यामुळे सीएसएमटी–पनवेल प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि गारेगार होणार आहे.
मध्य रेल्वेच्या नव्या नियोजनानुसार हार्बर मार्गावर दररोज १४ एसी लोकल फेऱ्या धावतील. यापूर्वी १ डिसेंबर २०२१ रोजी हार्बर मार्गावर पहिल्यांदा एसी लोकल सुरू करण्यात आली होती. मात्र एसी लोकलचे तिकीट व पासचे दर सामान्य लोकलपेक्षा अधिक असल्याने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यातच काही सामान्य लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आणि अखेर हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
आता पुन्हा एकदा ही सेवा सुरू करताना मध्य रेल्वेने काही बदलांसह एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे काही सामान्य लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गर्दीच्या वेळेत धावणारी सकाळी ९.०९ पनवेल–सीएसएमटी, संध्याकाळी ५.३० वडाळा रोड–पनवेल आणि रात्री ८ वाजताची सीएसएमटी–पनवेल ही तीन सामान्य लोकल फेऱ्या रद्द करून त्या वेळेत एसी लोकल धावणार आहेत. हार्बर मार्गावरील एसी लोकल पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध वेळेत धावतील. वाशी, वडाळा रोड, सीएसएमटी आणि पनवेल दरम्यान या लोकल सेवा उपलब्ध असणार आहेत. यामुळे नियमित प्रवाशांना वेळापत्रकात बदल करून प्रवास नियोजन करावे लागणार आहे.
दरम्यान, पश्चिम रेल्वेवरही प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेवर एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने २६ जानेवारीपासून १२ अतिरिक्त एसी लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या १०९ फेऱ्या चालतात, त्या वाढून आता १२१ होतील. यातील ६ फेऱ्या अप मार्गावर तर ६ फेऱ्या डाऊन मार्गावर धावतील. विशेष म्हणजे ४ फेऱ्या सकाळच्या गर्दीच्या वेळी आणि ८ फेऱ्या संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी धावणार आहेत. एकूणच, एसी लोकलमुळे प्रवास आरामदायी होणार असला तरी सामान्य लोकल फेऱ्या कमी झाल्यास प्रवाशांची गैरसोय होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.