श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळाने कहर केला आहे. या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत पूर आणि भुस्खलन झाले आहे ज्यामुळे आतापर्यंत 47 जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो लोक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर 21 जण बेपत्ता असल्याची माहिती देखील समोर आली आहे. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी दितवाह चक्रीवादळ (Cyclone Ditwah) पूर्व किनाऱ्यावर धडकले आणि तेव्हापासून चक्रीवादळाने कहर केला.
प्रशासनाने बचाव कार्य सुरु केले आहे. तसेच पर्यटन मंत्रालयाने पर्यटकांना सध्या श्रीलंकेला (Sri Lanka) भेट देऊ नये असे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहिती चक्रीवादळ दितवाहचे परिणाम भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये जाणवतील. या वादळांमुळे दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या भागात हवामानाची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या खोल दाबाच्या पट्ट्याचे तीव्रतेने रूपांतर होऊन ते चक्रीवादळ दितवाहमध्ये रूपांतरित झाले असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. तर चक्रीवादळ उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळच्या किनाऱ्यांकडे सरकत आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत या भागात अत्यंत तीव्र हवामानाचा अंदाज आहे. विभागाने किनारी भागातील मच्छिमारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे