भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील चले जाओ या महान चळवळीत सक्रिय सहभागी असलेले जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गांधी उर्फ अप्पा याचे जोगेश्वरी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 102 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुली , एक जावई ,नातवंडे असा परिवार आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आयुष्याच्या शेवट पर्यंत ते समाजकार्यात सक्रिय होते. त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही विधी न करता देहदान करण्यात येणार आहे.
दत्ता गांधी यांचा जन्म 15 मे 1923 रोजी पोलादपूर येथे झाला. ते त्यांच्या मामाकडे राहत होते. मेट्रिक नंतर ते मुंबई ला आले. 1952 मध्ये राष्ट्रीय सेवा दलाच्या कार्यकर्त्या किशोरी पुरंदरे यांच्याशी त्यांनी विवाह केला. त्यांनी विविध ठिकाणी समाजकार्यात सक्रिय सहभाग घेतला. पुण्यात एका राजकीय बैठकीमध्ये त्यांची भेट महात्मा गांधी यांच्या शी झाली आणि 1942 सालच्या चले जावो या आंदोलनात आपला सहभाग दर्शवला.
त्यासाठी त्यांना अटक ही झाली. त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्याच बरोबर मिठाच्या सत्याग्रहामध्ये ही त्यांना अटक झाली होती. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मी लढणारच हे माझे कर्तव्य आहे असे बोलून त्यांनी त्या वेळी मिळणारे ताब्रपट आणि पेन्शन ही नाकारली होती. 1949 साली साने गुरुजी यांनी छबिलदास शाळेमध्ये शिक्षक म्हणुन त्यांना कामाला लावले. जवळजवळ 35 वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.
अनेकांना मार्गदर्शनपर उपदेश दिले. ते काही काळ राष्ट्रीय सेवा दलाचे कार्यकर्ते ही होते. आयुष्याच्या शेवट पर्यंत त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य अबाधित ठेवले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 12 जून रोजी गोरेगाव च्या केशव गोरे स्मारकामध्ये अभिवादन सभेचे आयोजन केले आहे.