थोडक्यात
डॉक्टरांनी मृत घोषित केलेली व्यक्ती झाली जिवंत
कोल्हापूरच्या कसबा बावड्यातील घटना
अॅम्ब्युलन्समधून नेताना रस्त्यातील खड्ड्यामुळे हालचाल
पांडुरंग तात्या स्वत: घराकडे चालत आले
देव तारी त्याला कोण मारी... असं आपण अनेक वेळा म्हणत असतो. याचीच प्रचिती कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथे आलेली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात राहणाऱ्या पांडुरंग उलपे यांना चक्क एका रस्त्यातील खड्ड्यामुळे पुनर्जन्म मिळाला आहे. यावेळी नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे घोषित केलं. मात्र, घरी घेऊन जात असताना अशी एक घटना घडली की ज्यामुळे तात्या जिवंत झाले असं म्हटलं जात आहे.
नेमकं काय घडलं?
कसबा बावडा परिसरात राहणाऱ्या 65 वर्षीय पांडुरंग उर्फ तात्या उलपे यांना 16 डिसेंबर रोजी अचानक चक्कर आली आणि यामध्ये ते जमिनीवर कोसळले. तात्यांना चक्कर आल्याचं लक्षात येताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी घेऊन गेले. पांडुरंग उलपे यांच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र, काही वेळाने त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी डॉक्टरने त्यांना दिली. पांडुरंग उलपे मयत झाल्याची बातमी संपूर्ण कुटुंबीयांना कळविण्यात आली. नातेवाईकांनी पांडुरंग तात्यांना अंत्यसंस्कारासाठी घरी घेऊन जाऊ लागले. अंत्यसंस्काराची तयारी देखील करण्यात आली.
तात्या उलपे यांना घेऊन पुन्हा नातेवाईक घराच्या दिशेने ऍम्ब्युलन्स मधून येऊ लागले. ॲम्बुलन्स कसबा बावडा परिसरात येताचं एका चौकात ॲम्बुलन्स एका स्पीड ब्रेकरवर आदळली आणि या झटक्यात तात्या उलपे यांची बोटे हलू लागली. ही गोष्ट त्यांचे नातू रोहित रामाने यांच्या लक्षात आली. आणि तात्यांना जणू जीवदानच मिळालं.