दीपिका पदुकोण, इरफान आणि अमिताभ बच्चन यांची भावनिक गोष्ट सांगणारा चित्रपट 'पीकू' पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दीपिकाने ही माहिती सोशल मीडियावर शेअर करत केली आहे.
तिने लिहिलं आहे की, "या चित्रपटाला माझ्या मनात नेहमी खास स्थान आहे, पीकू सिनेमा परत येतोय, चित्रपटगृहांमध्ये 9 मे 2025 रोजी, असे ती या पोस्टमधून सांगते. पिकू सिनेमाला 10 झाली आहेत. इरफान, तुझी खूप आठवण येते! आणि नेहमी तुझा विचार मनात येतो." असे दीपिकाने या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
या कथेमध्ये एक मुलगी आणि तिच्या वडिलांमधील नात्याचे वेगळेपण, त्यांच्या दैनंदिन संघर्षांचे चित्रण आणि प्रेमाचा अनोखा प्रवास दाखवला आहे. 'पीकू' पहिल्यांदा 8 मे 2015 रोजी प्रदर्शित झाला होता. दीपिकाने एका ठाम मताची आणि प्रामाणिक स्वभावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे, तर अमिताभ बच्चन यांनी तिच्या हट्टी आणि खास स्वभावाच्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारली आहे. दिल्ली ते कोलकाता या प्रवासात दोघांचं नातं अधिकच घट्ट होतं आणि त्यातून अनेक भावनिक क्षण उलगडतात.
शुजित सरकार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट केवळ शारीरिक समस्येवर भाष्य करणारा सिनेमा नाही, तर जीवनातील गुंतागुंत, नातेसंबंध आणि प्रेम याविषयी हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करतो. प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा, हसवणारा आणि अंतर्मुख करणारा असा हा चित्रपट अनेकांच्या आठवणीत कायमचा घर करून राहिला आहे.