‘कबीर सिंग’ आणि ‘अॅनिमल’सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी बहुचर्चित चित्रपट ‘स्पिरिट’ मधून दीपिका पदुकोण बाहेर पडली आहे. तिच्या जागी आता नवोदित अभिनेत्री तृप्ती डिमरीची वर्णी लागली आहे. मात्र, या एक्झिटनंतर चित्रपटाच्या स्क्रिप्ट लीक प्रकरणावरून वाद पेटला आहे.
संदीप रेड्डी वांगांनी त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर एक पोस्ट करत नाव न घेता दीपिकावर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले, "जेव्हा मी पटकथा एखाद्या अभिनेत्याला सांगतो, तेव्हा माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असतो. पण एका कलाकाराने माझी कहाणी लीक करून आणि दुसऱ्या कलाकाराचा अपमान करून दाखवून दिलं की ती व्यक्ती कोण आहे. ही स्त्रीवादी भूमिका आहे का?"
दीपिकाच्या अटी ठरल्या वादग्रस्त
सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिका पदुकोणने गरोदरपणामुळे ‘स्पिरिट’ सोडायचा निर्णय घेतला होता. पण तरीही तिने कामासाठी काही अटी ठेवल्या. आठवड्यातून 5 दिवस आणि फक्त 8 तासच शूटिंग, नफ्यात वाटा, तसेच तेलुगू संवाद टाळण्याची मागणी. या मागण्यांमुळे वांगा आणि टीम नाराज झाली आणि शेवटी तिला चित्रपटातून वगळण्यात आलं.
तृप्ती डिमरीची एन्ट्री
दीपिकाच्या जागी आता ‘काला’ आणि ‘अॅनिमल’ मधून प्रसिद्धी मिळवलेली तृप्ती डिमरीची निवड करण्यात आली आहे. तिची अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. तृप्ती प्रभासच्या विरुद्ध मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय
संदीप रेड्डी वांगाची पोस्ट, दीपिकाचे एक्झिट आणि स्क्रिप्ट लीक प्रकरण सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. मात्र, अद्याप दीपिकाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.