केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज, गुरुवारी जम्मू आणि काश्मीरचा एक महत्त्वाचा दौरा सुरू केला. त्या प्रदेशातील एकूण सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. ऑपरेशन सिंदूरनंतर हा त्यांचा जम्मू आणि काश्मीरचा पहिलाच दौरा आहे. 7 मे रोजी पहाटे भारताने दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले, त्यानंतर पाकिस्तानने 8, 9 आणि 10 मे रोजी भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
बदामी बाग छावणीत भाषण करताना राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, "दहशतवाद आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आपल्या शूर जवानांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला मी नमन करतो. त्यांच्या स्मृतीस मी आदरांजली वाहतो. पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या निष्पाप नागरिकांनाही मी आदरांजली वाहतो. जखमी सैनिकांच्या शौर्याला मी सलाम करतो आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे, अशी देवाला प्रार्थना करतो."
पुढे त्यांनी नमूद केले की, "अशा प्रतिकूल परिस्थितीत तुमच्यामध्ये असल्याचा मला अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुम्ही जे काही केले त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. तुमचा संरक्षण मंत्री होण्यापूर्वी, मी एक भारतीय नागरिक आहे. संरक्षण मंत्री असण्यासोबतच, मी एक भारतीय नागरिक म्हणून तुमचे आभार मानण्यासाठी येथे आलो आहे," असे सिंह पुढे म्हणाले.