देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतीने हादरली आहे. लाल किला मेट्रो स्टेशनच्या बाहेर झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. या स्फोटानंतर समोर आलेल्या एका प्रत्यक्षदर्शीच्या व्हिडिओने नागरिकांना अक्षरशः थरकाप उडवला आहे. “असं वाटलं जणू पृथ्वीच फाटून जाईल,” असे वर्णन करताना त्या दुकानदाराच्या चेहऱ्यावर अजूनही भीतीचे सावट स्पष्टपणे दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये लाल किल्याजवळील बाजारातील एका दुकानदाराने आपल्या डोळ्यांसमोर घडलेला प्रसंग सांगितला आहे. न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना तो म्हणतो, “मी दुकानात खुर्चीवर बसलो होतो, अचानक असा जोरदार आवाज झाला की मी तीन वेळा खुर्चीवरून खाली पडलो. पहिल्यांदा आवाज ऐकून उठलो, पण पुन्हा पडल्यासारखं वाटलं. आयुष्यात इतका मोठा स्फोटाचा आवाज मी कधी ऐकला नव्हता. असं वाटलं जणू संपूर्ण बाजारच हादरून जाईल.”
हा स्फोट सोमवारी सायंकाळी घडला, तेव्हा लाल किला परिसरात नेहमीप्रमाणे पर्यटकांची आणि नागरिकांची मोठी गर्दी होती. लोक दफ्तरांतून घरी परतत होते, अनेक जण लाल किल्याच्या पार्श्वभूमीवर फोटो घेत होते. त्याचवेळी अचानक एका कारमधून भीषण आवाजासह स्फोट झाला आणि क्षणार्धात अफरातफर माजली. स्फोटानंतर काही वाहनांना आग लागली, तर आसपासच्या दुकानांचे काचेचे दरवाजे फुटले. या घटनेनंतर जुनी दिल्ली परिसरातील अनेक भागांत स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले.
स्फोटानंतर सोशल मीडियावर आलेल्या या व्हिडिओने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एका यूजरने लिहिले “धमाके के गुनाहगारों को सख्त सजा होनी चाहिए.” तर दुसरा म्हणतो, “कितना भयानक रहा होगा वो मंजर!”
पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, परिसर सील करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्फोटाचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनेमुळे दिल्लीतील सुरक्षाव्यवस्था पुन्हा एकदा तपासणीच्या केंद्रस्थानी आली आहे.
लाल किला परिसरातील हा स्फोट केवळ परिसरातील लोकांसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी धक्कादायक ठरला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या भीतीदायक साक्षी आणि हादरवून टाकणारा व्हिडिओ पाहून नागरिकांच्या अंगावर शहारे येत आहेत.