राज्यात हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. 5 जुलै रोजी मुंबईत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.
याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते सुनिल तटकरेंनी आपली स्पष्ट भूमिका मांडत म्हटलं होत की," 5 तारखेला जो मोर्चा निघणार आहे त्याकडे मी राजकीय दृष्ट्या बघत नाही. हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य न करता पाचवी पासून पर्यायी ठेवावी अशी आमच्यासह सर्वांचीच भूमिका राहिली आहे. हा मोर्चा विरोधी पक्षांचा आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा कुणीही नेता यात सहभागी होणार नाही". असं ते म्हणाले होते.
यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, "सक्ती नाही, ज्याला त्याला आपल्या राज्यातील मातृभाषा आली पाहिजे याबाबत दुमत नाही. पाचवी पासून हिंदीचा विचार करावा असं आम्ही म्हणालो, इंग्लिश मिडीयममध्ये जाणाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे, मराठी भाषा हीच भाषा सक्तीची आहे. पहिलीपासून हिंदी सक्ती केलीच पाहिजे या मताचे आम्ही नाहीच. उद्या आमची कॅबिनेटमध्ये चर्चा होईल".