‘काँटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टी हादरून गेली आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तिचा मृत्यू झाला. 41 वर्षीय शेफालीने आपल्या आयुष्यातील अनेक संकटांचा खंबीरपणे सामना केला होता. मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी, विशेषतः तिचं आई न होण्याचा घेतलेला निर्णय, तिच्या मृत्यूनंतर पुन्हा चर्चेत येत आहेत.शेफालीने आपल्या वैयक्तिक संघर्षांविषयी अनेक मुलाखतींमध्ये स्पष्टपणे मते मांडली होती. तिचं पहिलं लग्न गायक हरमीत सिंगसोबत झालं होतं, जे फार काळ टिकलं नाही. त्या नात्यामध्ये मानसिक त्रास सहन करावा लागल्यामुळे ती तुटली होती. एका मुलाखतीत तिने स्पष्ट केलं होतं की, “तुमचं कुठे आदर होत नाही हे समजणं खूप महत्त्वाचं असतं. मानसिक हिंसाही माणसाला आतून पोखरून टाकतो.”
या सर्व अनुभवांचा परिणाम शेफालीच्या मानसिक आरोग्यावर झाला होता. तिने नैराश्य, पॅनिक अटॅक आणि चिंता यांसारख्या समस्यांना तोंड दिलं. तिच्या म्हणण्यानुसार, तिला सावरण्यासाठी कुटुंब आणि जवळच्या लोकांची मजबूत साथ मिळाली. कोविड महामारीनंतर तिच्या मनात आई होण्याबाबत भीती निर्माण झाली होती. “मलाही बाळ हवं होतं, पण कोविडनंतर आयुष्याचाच विश्वास उरलेला नव्हता. पराग तयार होता, पण मला वाटलं की फक्त आर्थिकदृष्ट्याच नाही तर मानसिकदृष्ट्याही तुम्ही तयार असायला हवं,” असं ती म्हणाली होती. तिचा निर्णय हा पूर्णपणे वैयक्तिक आणि भावनिक अनुभवांवर आधारित होता.
शेफालीने तिच्या संघर्षात आर्थिक अडचणींचाही सामना केला. ‘काँटा लगा’ गाण्याच्या यशाआधी तिच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली नव्हती. “माझ्या आईला आमच्या कॉलेजची फी भरण्यासाठी तिच्या सोन्याच्या बांगड्या विकाव्या लागल्या. तेव्हा मी ठरवलं,आईला पुन्हा अनेक सोन्याच्या बांगड्या घेऊन देईन,” असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती. हृदयविकाराच्या झटक्याविषयी जनजागृती करणे हे शेफालीचे आणखी एक उद्दिष्ट होते. “मला झटका आला तेव्हा मी बाल्कनीत उभी होते. मी खाली पडूनही मरणार होते. कोणालाही कधी झटका येईल हे सांगता येत नाही,” असं ती अनुभव कथनात म्हणाली होती. शेफालीचं आयुष्य म्हणजे आत्मभान, संघर्ष, आणि आत्मनिर्भरतेचा एक जिवंत उदाहरण होतं. तिचं अचानक जाणं अत्यंत दु:खद आहे, पण तिच्या अनुभवांमधून अनेकांना प्रेरणा मिळत राहील, हे मात्र नक्की.
हेही वाचा..