यंदाचं वर्षे निवडणुकांचं वर्ष होतं. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. लोकसभेमध्ये महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, विधानसभेमध्ये महायुतीने मेजर कमबॅक केलं. महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं. निकालानंतर अखेर आज १२ दिवसांनंतर महायुतीने राज्यात सरकार स्थापन केलं. मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. राज्याला पुन्हा एकदा ट्रिपल इंजिन सरकार मिळालं आहे. महायुतीचा शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
'मी पुन्हा येईन'
पाच वर्षांपूर्वी 'मी पुन्हा येईन' असा दावा करणारे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस...असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेत स्वत:च्या नावावर वेगळा विक्रम रचला. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे ते महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा आणि जे.पी.नड्डांसह केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योगपती, सेलिब्रिटीज उपस्थित होते.
बाळासाहेब, आनंद दिघे यांचं स्मरण करत एकनाथ शिंदे यांनी घेतली शपथ
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरण करत एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक करत त्यांनी शपथ घेतली. तसेच त्यांनी यावेळी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत.
‘मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की…’ : अजित पवार यांचा वेगळा अंदाज
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेण्याचा विक्रम केला. तसेच मी शपथ घेतो ऐवजी त्यांनी ‘मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की…’ या शब्दाचा वापर करत वेगळपणा सिद्ध केला. राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.