महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आहे. विधानसभेच्या अधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याचं उघड निमंत्रण दिलं आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना निरोप देण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात फडणवीसांनी हे विधान केलं.
"उद्धवजी, २०२९ पर्यंत तुमच्यासाठी फारसा स्कोप नाही. आम्ही विरोधी बाकांवर येण्याची शक्यता नाही. पण तुम्हाला समोरच्या बाकांवर यायचं असल्यास, तो विचार जरूर करा… पुढे खासगीपणे बोलू,” असं सूचक विधान करत फडणवीसांनी पुन्हा एकदा शिवसेनेसमोर सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
या विधानानंतर राजकीय चर्चांना नव्यानं उधाण आलं आहे. विशेषतः काही दिवसांपूर्वीच मुंबईतील डोम सभागृहात 'राजा-उद्धव एकत्र' होण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या वक्तव्याने या चर्चेला नवा रंग चढवला आहे. या घडामोडींमुळे आगामी निवडणुकांआधी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. आता उद्धव ठाकरे यांची भूमिका काय राहणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.