लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी या योजनेला पुढील पाच वर्षांची हमी दिली. तसेच हप्ता दुप्पट करण्याचा मुद्दा ‘योग्य वेळ येताच’ निर्णयात आणला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत सुरुवातीला सर्व महिलांसाठी 1500 रुपयांचे मानधन जाहीर झाले. निवडणूक काळात ही रक्कम 3000 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा झाली होती.
मात्र सत्तेत आल्यानंतर पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले, ज्यामुळे अनेक महिला लाभापासून वंचित राहिल्या. हप्ता दुप्पट करण्याबाबत सातत्याने विचारणा होत असताना, फडणवीस यांनी सध्या योग्य वेळेची वाट पाहत असल्याचे सांगितले. कार्यक्रमात त्यांनी योजनेतील गैरव्यवहारांवरही भाष्य केले. काही गैरपात्र लाभार्थ्यांचे अनुदान थांबवण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांना सखोल पडताळणीचे आदेश दिले आहेत. पात्र असलेल्या लाभार्थींना हक्काचा लाभ लवकरच मिळेल, असे त्यांनी आश्वासन दिले.
महिला बचत गटांच्या ‘लखपती दीदी’ उपक्रमाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सध्या 25 लाख लखपती दीदी कार्यरत आहेत आणि यंदा आणखी 25 लाख तयार करण्याचा मानस आहे. पुढील काही वर्षांत ही संख्या कोटीच्या घरात पोहोचेल. तसेच बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 10 मॉल उभारले जाणार आहेत. सरकारच्या या आश्वासनामुळे योजना लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, मात्र हप्ता दुप्पट कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.