मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी मनोज जरांगे मराठा आंदोलकांसह मुंबईतील आझाद मैदानावर दाखल होणार आहेत. मराठा आंदोलकांचा हा मोर्चा नवी मुंबईहून मुंबईकडे रवाना होणार आहे. याचपार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. मात्र कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणी वागू नये. मराठा आरक्षणासंदर्भात आमच्याच सरकारनं निर्णय घेतले. आम्हीच आरक्षण दिल आणि ते कोर्टातही टिकलं. मात्र ओबीसीमधून आरक्षण मागणाऱ्यांची मागणी मला कळत नाही. ओबीसी मध्येच 350 जाती आहेत".
"सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणासाठी आम्ही निर्णय घेतला आहे. पण राजकीय आरक्षणासाठी लढाई सुरु आहे का? हे स्पष्ट करावं. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ अनेक वर्षे अस्तित्वात नव्हतं येत, तो निर्णय आम्ही घेऊन कोट्यवधींची मदत दिली. सारथी मधून अनेक अधिकारी बनवले. मागच्या अनेक वर्षांत मराठा समाजासाठी बाकीच्या नेत्यांनी एक सिंगल निर्णय घेतलेला मला दाखवून द्या".
"दोन्ही समाजाला विनंती आहे, शासन दोघांच्याही हिताचा विचार करेल. कुणावर अन्याय होण्याची भूमिका नाही. मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले हे समाजाने लक्षात घ्यावं. ओबीसींवर अन्याय होणार नाही, इतर राज्यात असलेल्यांनी हे समजून घेतलं की आर्थिक निकषावर असलेलं आरक्षण घेतलं म्हणून प्रश्न सुटला".